बंद करा ती बीभत्स चित्रे !

विनंती

मोठ्या राजकीय नेत्यांच्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर वारंवार पाहून, संस्क्रुत महाकवी प्रद्न्याभारती डाँ. श्रीधर भास्कर उपाख्य दादासाहेब वर्णेकर पाव शतकापूर्वी कळवळून म्हणाले होते- “टीव्हीने स्मशानातील अंत्यसंस्कार थेट तुमच्याआमच्या घरातील दिवाणखान्यात आणून सोडला आहे. खरंच हा इडियट बाँक्स आहे ! हा प्रकार बंद होण्याची नितांत आवश्यकता आहे.”
हेच आवाहन पुन्हा करण्याची पाळी सध्या आली आहे. आधीच कोरोनाने देशभर कहर माजविलेला असताना व्रुत्तवाहिन्या, सोशल मीडियातील काही संकेतस्थळे भयानक द्रुश्ये वारंवार दाखवून लोकांमध्ये भय आणि निराशा पसरविण्यात हातभार लावताना दिसत आहेत. अशी द्रुश्ये दाखविणारी चित्रे, व्हिडिओ यावर ताबडतोब बंदी घालण्याची गरज आहे. हतबल रुग्ण, त्यांचे नातेवाईक, मित्र आदींच्या मनावर याचा विपरीत परिणाम होतो, हे वेगळे समजावून सांंगण्याची गरज तरी आहे का ?
इस्पितळात होणारी गैरसोय, औषधांचा तुटवडा, स्मशानभूमीत होणारी हेळसांड या चुकीच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचू नये, असा याचा अर्थ नाही. या गोष्टींना तोंड फोडलेच पाहिजे. परंतु ते काम शब्दांनीही करता येऊ शकते. वर्तमानपत्रे, सोशल मीडिया यांनी लिहून, तर व्रुत्तवाहिन्यांनी वाचून ही माहिती जनतेपर्यंत जरूर पोहोचवावी. पण त्यासोबत चित्र, व्हिडिओ कशाला ? अस्पष्ट किंवा सांकेतिक चित्रानेही काम भागू शकते ना. त्याऐवजी दवाखान्यात होणारे हाल, स्मशानात जळणाऱ्या चिता, कुत्र्यांनी ओढलेले म्रुतावशेष प्रत्यक्ष पाहून कोणाच्या तरी मनावर चांगला परिणाम होईल का ? फक्त माहिती सांगूनही सतर्क करता येतेच की. आपल्याला लोकांना सावध करायचे आहे की भयग्रस्त, हेच मुळात ठरविले पाहिजे. करायला गेलो एक आणि झाले मात्र भलतेच, असे होऊ नये यासाठी सर्वांनी सचित्र माहितीचा मोह टाळला पाहिजे. विशेषत: व्रुत्तवाहिन्यांनी तर हे कटाक्षाने करण्याची गरज आहे. कारण, घराघरातील मुले, महिला, ज्येष्ठ हे सारे दुष्परिणामांचे शिकार होऊ शकतात. त्यांना विनाकारण चर्चेला विषय मिळतो, डोळ्यांपुढे तीच ती चित्रे वारंवार तरळत राहतात. याचा काय परिणाम होत असेल, कल्पनाही करवत नाही. म्हणूनच सर्व संबंधितांनी हा गंभीर विषय तातडीने मनावर घेण्याची गरज आहे. समाजाचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी हे आवश्यक होऊन बसले आहे.
यासंदर्भात अमेरिकेचे उदाहरण बोलके ठरावे. वीस वर्षांपूर्वी न्यूयाँर्कच्या ट्विन टाँवरवर हल्ला करून दहशतवाद्यांनी ते जमीनदोस्त केले. यात दोन हजारांवर माणसे मारली गेली. अमेरिकन व्रुत्तपत्रे, व्रुत्तवाहिन्या यांनी या घटनेच्या बातमीत एकही बीभत्स चित्र येऊ दिले नाही. म्रुतदेह तर दूरच, रक्ताचा एक थेंबही दाखवला नाही. अशी सकारात्मकता किमान कोरोना काळात तरी दाखविणे आपल्याला अशक्य आहे का ? क्रुपया थांबवा ती सचित्र वर्णने. जनतेचे मनोबल खच्ची करण्यास कारणीभूत का होता ? जगलोवाचलो तर स्पर्धा पुढेही करता येईल. Mad race च्या नादात समाजाला नाजूक क्षणी हादरे बसत आहेत. त्यांचा आवाज ऐका जरा ! आणि, भानावर या !

-विनोद देशमुख

Leave a Reply