जिल्हयातील वैद्यकीय व्यवस्था प्रबळ करण्यासाठी हंसराज अहिर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

चंद्रपूर: १७ एप्रिल – जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण ही चिंतेची बाब असून, कोरोना बधितांना खाटा, प्राणवायू तसेच व्हेंटिलेटर,करिता भटकावे लागत आहे. वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असताना रुग्णांचे व त्यांच्या परिवाराचे हाल होत आहेे. असे सांगत माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था अधिक प्रबळ करून जिल्ह्यातील बधितांना योग्य सुविधा देण्याची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
चंद्रपूर शासकीय महाविद्यालयातील महिला रुग्णालयात केंद्रित प्राणवायू प्रणाली, व्हेंटिलेटर, अतिदक्षतेच्या व्यवस्थेसह ४00 खाटा उपलब्ध असून, या सुविधा त्वरित सुरू कराव्या. येथे चिकित्सकांची गरज असल्याने सेवाभावी आयएमएमशी याबाबत चर्चा करून त्यांचे सहकार्य घ्यावे. जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरासह प्रमुख शहरातील खाजगी रुग्णालये, बालरोग रुग्णालयासह अधिग्रहित करावे. वेकोलिचे माजरी, घुग्घुस, बल्लारपूरचे रुग्णालय कोविड.१९ साठी त्वरित अधिग्रहित करावे. वेकोलिच्या लालपेठ रुग्णालयात सामान्य रुग्णालयातील एक विभाग स्थलांतरित करून त्याजागी कोविड.19 च्या खाटा वाढवाव्या, रेमडेसिविरची कमतरता भासणार नाही यासाठी अधिक मागणी करून उपलब्ध करून घ्यावे. ज्येष्ठ डॉक्टरांसह बीएएमएस. बीएचएमएस व अन्य व्यवसायी डॉक्टरांची कोविड.१९ च्या सेवेकरिता मदत घ्यावी. रुग्णांसाठी खोल्यांची अडचण पाहता मंगलय कार्यालये, वसतिगृह, शाळा व अन्य अधिग्रहित करून गरीब कुटुंबासाठी व्यवस्था करावी व यात महानगर पाालिकेने पुढाकार घ्यावा. या मागण्या अहिर यांनी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या. यावेळी अहिर यांनी, प्रबळ आरोग्य सेवा हे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या व वैदयकीय सेवा सुद़ृढ करावी. प्रत्येक रुग्णाला योग्य ती वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातील भीतीचे वातावरण कमी होईल. तसेच रुग्णसंख्या आटोक्यात येऊन जिल्ह्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल होईल. असे यावेळी अहीर यांनी सांगितले. येत्या काही दिवसात जनहितार्थ केलेल्या या मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचे संकेतसुद्धा यावेळी हंसराज अहीर यांनी दिले.
000000000000000000

Leave a Reply