त्या पाप्यांनी मुकेशभाईंची माफी मागायला हवी

संपादकीय संवाद

काही दिवसांपूर्वी जागतिक कीर्तीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर स्फोटके ठेवलेली एक कार सापडली होती. हे प्रकरण अजूनही गाजतेच आहे, त्यात आरोपी म्हणून महाराष्ट्रातीलच एक पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या अटकेत आहे, सचिन वझेचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आणि महाराष्ट्रातील उच्चपदस्थ व्यक्ती असल्याचा आरोप कुजबुजीच्या स्वरूपात केला जातो आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढलेले आहेत त्यांना देण्यासाठी रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी रुग्णालयात बेड्सही नाहीत. त्यांना द्यायला ऑक्सिजनदेखील उपलब्ध नाही. अशा वेळी तेच मुकेश अंबानी जुने सर्व काही विसरून उदार मनाने पुढे आले आहेत.
मुकेश अंबानी यांनी गुजरातेतून ऑक्सिजनचे सिलिंडर्स मोठ्या संख्येत उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरासमोर स्फोटके ठेवली होती आणि सोबत धमकीचे पत्र देखील होते. हे पापकृत्य करणारा कुणीही असो पण, तो महाराष्ट्रातीलच माणूस होता तरीही मुकेशभाई महाराष्ट्रावरील राग विसरले आणि त्यांनी मोठ्या मनाने महाराष्ट्राला मदतीसाठी हात पुढे केला जुने सर्वकाही विसरून त्यांनी मराठी माणसाचे हित जपण्याचा प्रयत्न केला .
मूकेशभाईंची ही कृती निश्चितच अभिनंदनीय आहे त्याबद्दल समस्त महाराष्ट्रीय बांधवांतर्फे त्यांना मानाचा मुजरा.
त्याचबरोबर त्यांच्या घरासमोर स्फोटके आणि धमकीचे पत्र ठेवण्याचे कट कारस्थान करणारे जे कोणी पापी असतील त्यांनीही मुकेशभाईंची नाक घासून माफी मागायला हवी. फक्त मुकेशभाईंचीच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची देखील.
अन्यथा जो कोणी पापी यात सहभागी असेल त्याला १२ कोटी महाराष्ट्रीयन जनतेचे तळतळाट भोवल्याशिवाय राहणार नाहीत.

अविनाश पाठक

Leave a Reply