कुंभमेळ्यातील अनेकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

नवी दिल्ली : १६ एप्रिल – देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध आहेत. अशात दुसरीकडे हरिद्वार कुंभमेळ्यात शाही स्नानादरम्यान लाखोंच्या संख्येनं भाविक आणि साधू – संत एकत्र जमले असल्याचं चित्र आहे. हरिद्वार कुंभमेळ्यातील अनेकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी 30 साधूंनाही कोरोनाची लागण झाली आहे. हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस के झा यांनी सांगितलं, की हरिद्वारमध्ये आतापर्यंत 30 साधूंचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या वैद्यकीय टीम आखाड्यत दाखल झाल्या असून सलग साधूंची RT-PCR चाचणी केली जात आहे. 17 एप्रिलपासून ही प्रक्रिया आणखी वेगाने केली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हरिद्वारमधील कुंभमेळ्यादरम्यान केवळ या 30 साधूंचेच नाही तर अनेक भाविकांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, अद्याप सर्वांच्या चाचण्या झाल्या नसल्यानं एकूण बाधितांचा निश्चित आकडा सांगणं शक्य नसल्याची माहिती महाकुंभ मेळ्यासोबत जोडल्या गेलेल्या सीएमओ अर्जुन सिंह सेंगर यांनी दिली आहे.
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रसार आणि हरिद्वार कुंभमध्ये दररोज आढळणारे कोरोना रुग्ण पाहाता आता निरंजनी आखाड्यानं कुंभ समाप्तीची घोषणा केली आहे. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभच्या समाप्तीची घोषणा करत सांगितलं, की कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आखाड्यानं असा निर्णय घेतला आहे, की 17 एप्रिलला कुंभ मेळा समाप्त केला जाईल. पुरी यांनी इतर आखाड्यांनाही मेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. पुरी म्हणाले, की कोरोना स्थिती पाहाता लोकांच्या हितासाठी मेळा समाप्तीची घोषणा करणं गरजेचं आहे.

Leave a Reply