आमच्या डीएनएत विकास, राष्ट्रवाद आणि आत्मनिर्भर भारत – अमित शाह

कोलकाता : १६ एप्रिल – देशात करोनाचा प्रकोप असताना निवडणुकांसाठी नेत्यांच्या प्रचारसभा होत आहे. पश्चिम बंगालमध्ये तर ममता विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या प्रचारसभेत ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपानं बंगाल काबिज करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं असून, ममतांच्या तृणमूलला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
‘आपण बंगालमध्ये घुसखोरी का थांबवू शकत नाही? घुसखोर आमच्या तरुणांच्या नोकऱ्या बळकावत आहे. गरीबांचं धान्य पळवून नेत आहेत. जर बंगालमध्ये हीच परिस्थिती कायम राहिली तर बंगालमध्ये स्थिती खराब होईल. इतकंच काय तर याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील’, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. ‘देशात एक पर्यटक नेता आहे. मतदानाच्या चार टप्प्यात राहुल बाबा कुठेही दिसले नाही. राहुल गांधी यांनी एक सभा घेतली आणि भाजपाच्या डीएनएबद्दल बोलले. आमच्या डीएनएत विकास, राष्ट्रवाद आणि आत्मनिर्भर भारत आहे, हे लक्षात ठेवा’, अशी टीका त्यांनी केली.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला असून पाचव्या टप्प्यात सहा जिल्ह्यातील ४५ जागांसाठी मतदान होणार आहे. १७ एप्रिलला मतदान होणार असून शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. सहाव्या टप्प्यासाठी २२ एप्रिल, सातव्या टप्प्यासाठी २६ एप्रिल, तर आठव्या टप्प्यासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागणार आहे.

Leave a Reply