अकोल्यात रेमडेसिविर इंजेक्शन ना नफा ना तोटा तत्वावर विक्री सुरु

अकोला : १४ एप्रिल – करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यातून काही प्रमाणात काळाबाजारही सुरू झाला असून सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. हे लक्षात घेऊन शहरातील एका औषध विक्रेत्याने करोना आजारात आवश्यक असलेले रेमडेसिविर या इंजेक्शनची ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर विक्री सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.
अकोला जिल्ह्यात या इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे तर, काही ठिकाणी याचा काळाबाजार करून रुग्णांची लूट केली जात आहे. मात्र, अकोल्यातील एका औषध दुकानदाराने माणुसकी जपत हे इंजेक्शन ‘ ना तोटा ना नफा’ तत्वावर उपलब्ध करून देवून माणुसकीचा परिचय दिला .अकोला जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मर्यादित असूनही अनेक औषध दुकाने तसेच रुग्णालयात त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने याची किंमत कमी करावी अशी मागणी होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन बाजारात तब्बल पाच ते दहा हजारांपर्यंत विकले जात आहे. मात्र, अकोल्यातील सिव्हिल लाईन येथील मेडिकलमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णांची कोणतीही लूट न करता कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता हे इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे.रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड पाहून संबंधित दुकानदाराने हे इंजेक्शन ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर विकण्याचा निर्णय प्रस्तुत औषध विक्रेत्याने घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply